पुणे – पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांची महाराष्ट्र राज्याचे विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणेतर्फे महावस्त्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत 1950 सालापासून प्रचलित असलेल्या महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील तरतूदी या विद्यमान शिक्षण क्षेत्र तसेच हॉस्पिटल नियमनांबाबत कालबाह्य झाल्या आहेत.
या दोन्ही क्षेत्रातील कालानुरूप बदल अंतर्भूत करून नविन कायदे अस्तित्वात आणावेत, अशी पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे विश्वस्त ऍड. शिवराज कदम जहागिरदार यांनी केली.
याप्रसंगी पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के, उपायुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक आयुक्त राहूल चव्हाण व अमरदीप तिडके तसेच अधिक्षक रुपेश गायकवाड हे उपस्थित होते.
याबाबत योग्य ते निवेदन आल्यावर त्याबाबत पाठपुरावा करता येईल असे प्रधान सचिव धोटे यांनी आश्वासन दिले. यावेळी पुणे धर्मादाय कार्यालयाने कोविड काळात केलेल्या कार्याची त्यांनी आवर्जून दखल घेतली व समाधान व्यक्त केले.
तसेच धार्मिक व सामाजिक संस्थांनी गरजू व वंचित समाजघटकांसाठी सतत कार्यरत रहायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. याविषयी ऍड. शिवराज कदम म्हणाले, कालानुरूप बदल होणे हे कोणत्याही कायद्याच्या परीणामकारकतेसाठी आवश्यक आहे.
सद्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे विविध विद्याशाखांमध्ये विस्तारलेले शिक्षणक्षेत्र तसेच अद्यावत उपकरणांनी सुसज्ज रूग्णालये हवी असतील तर या दोन्ही क्षेत्रातील गरजा व आव्हाने पेलणारे आधुनिक कायदे निर्माण व्हायला हवेत.