बीड – बीड जिल्ह्यात सध्या एका अनोख्या प्रेमकहाणीची चांगलीच चर्चा रंगली आहे. एका तरुणाचा तृतीयपंथीयावर जीव जडला असून ते 6 मार्चला विवाहबंधनात अडकणार आहेत. बाळू तोडमल असे तरूणाचे नाव असून सपना असे तृतीयपंथीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माळापूरी येथील बाळू हा तरुण ढोलकी वादक आहे. तो जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात ढोलकी वाजवतो. एका कार्यक्रमात त्याची ओळख सपना नावाच्या तृतीयपंथीशी झाली. ओळखीनंतर दोघांमध्ये प्रेम झाले. बाळूने सपनाला लग्नाची मागणी घातली. पहिल्यांदा सपनाने लग्नास नकार दिला. यामुळे निराश होऊन त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाळूनचे प्रेम पाहून सपनाने लग्नास होकार दिला.
बाळूच्या कुटुंबियांनीही दोघांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. अखेर दोघे 6 मार्चला लग्नबेडीत अडकणार आहेत. तृतीयपंथी जीवन जगताना लग्न हा विषय मनात कधी आलाच नाही. मात्र बाळूची ओळख झाली आणि संबंध जुळले, आता लग्न होतंय याचा आनंद असल्याची भावना सपानने व्यक्त केली आहे. मराठवाड्यातला हा पहिलाच अनोखा विवाह सोहळा असणार आहे.