ओवेसींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी खोटा आणि चुकीचा व्हिडीओ त्यांच्या सोशलमीडियावर पोस्ट केला होता. त्यांच्या या खोटेपणाचा भांडाफोड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाक आणि पयार्याने पंतप्रधान इम्रान खान यांची नाचक्की झाल्याचे दिसत आहे. त्यांच्या याच कृतीवर एमआयएमचे अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी यांनी पाकला सुनावले आहे. तुम्ही तुमचा देश सांभाळा, भारतीय मुस्लिम आम्ही आहोत आणि असणार याचा आम्हाला गर्व असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी बांगलादेशचे पोलिस नागरिकांवर लाठीचार्ज करतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. परंतू, हे करत असताना त्यांनी भारताची खोडी काढण्याच्या हेतूने व्हिडीओतील पोलिस भारतीय असल्याचे म्हटले होते. परंतू, थोड्यावेळाने पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाली आणि त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. यावर ओवेसी यांनी इम्रान खान यांनी आपल्या देशातील मुस्लिमांची चिंता करावी, स्वत:चा देश त्यांनी अगोदर व्यवस्थित सांभाळावा, भारतीय मुस्लिम असल्याचा आम्हाला गर्व आहे असे म्हटले आहे.