मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांना फटकारले आहे. सांगलीमध्ये दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांना “तुम्हाला गंमत-जंमत करण्याचा अधिकार नाही कारण हि काही महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही” असे म्हटले आहे.
खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांच्या पगाराच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. एक मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा त्याला लाईटली घ्यायचं नसतं. चेष्टेवारी न्यायचं नाही आणि चेष्टाही करायची नाही. गंमतजमंत करायचा अधिकार तुम्हाला नाही. ही काही महाराष्ट्रची हास्यजत्रा नाही. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. तुम्ही भाषण करताना विचार करूनच बोला, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना फटकारले आहे.
पुढे बोलत असताना त्यांनी ,”इतका मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची? शक्य-अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायची आहे, कारण वक्तव्य त्यांनी केल आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. जर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का?, असा सवाल करतानाच ऊठसूठ महाराष्ट्रातील मंत्री बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगारावर भाष्य केलं होतं. शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांची कमतरता आहे. पण तरीही धकवलं जातंय. प्राध्यापकांची कमतरता निघून जावी म्हणून 2072 प्राध्यापकांची भरती करतोय.प्राचार्यांच्या सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. ज्या ज्या महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत, तिथे भरती होणार आहे. त्या सर्व महाविद्यालयांना प्राचार्य भरण्याची मी परवानगी देत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याच वक्तव्याचा समाचार सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे.