त्यात तुम्हाला लुडबूड करण्याचा अधिकार नाही – शरद बुट्टे पाटील

कडूस येथे अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा

कडूस – अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला म्हणून मित्र पक्ष माझी पक्षातून हकालपट्टीची मागणी करीत आहे. मात्र आमच्या पक्षाकडे माझी हकालपट्टी करण्यासाठी तुम्हाला लुडबूड करण्याचा अधिकार नाही. तुमचे जनमत स्वतःहून तुम्हीच कमी केले आहे. येत्या 24 तारखेला जनताच मागणी करणाऱ्यांची हकालपट्टी करणार आहे. तसेच जिल्ह्यात एकमेव अपक्ष आमदार म्हणून अतुल देशमुखच निवडून येणार, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केला.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ कडूस येथे बुधवारी (दि. 14) झालेल्या सभेत बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी अपक्ष उमेदवार अतुल देशमुख, जिल्हा नियोजम समितीचे सदस्य दिलीप मेदगे, कैलास गाळव, राजगुरूनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, माजी सरपंच अश्‍विन भंडलकर, रघुनाथ लांडगे, सुनिल देवकर, संजय रौंधळ, चंद्रकांत शिंदे, विशाल शिंदे, अशोक नाईकरे, सबाजी मेदगे, योगेश गावडे, प्रकाश कालेकर, शब्बीर मुलाणी, सुषमा अरगडे, चांगदेव ढमाले, मंगेश गुंडाळ, रामदास सावंत, बाळासाहेब शिंदे, विशाल ससाणे, सचिन लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने कडूस परिसरातील नागरिक उपस्थित होते

शरद बुट्टे पाटील म्हणाले की, तालुक्‍यात आम्ही जनतेची कामे केली म्हणून आम्ही मते मागत आहोत. तुम्हाला जनतेने संधी देऊनही कामे करता आली नसल्याने तुमची अकार्यक्षमता लोकासमोर आली आहे. पाच वर्षे विनोद करण्यात आणि निष्क्रिय राहण्यात निघून गेल्याने जनता कधीच स्वीकारणार नाही. अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील यांच्यावर टीका, आरोप कारण्यापलीकडे विरोधकांकडे भांडवल नसल्याने जागरूक मतदारराजा तुम्हाला घरची वाट दाखवेल, अशी खरमरीत टीका आमदार गोरे यांचे नाव न घेता केली.

खेड तालुक्‍यातील जनता वैचारिक आहे, तिला भावी काळात आपले प्रश्‍न सोडविणारा, सुख-दुःखात उपयोगी पडणारा आणि जनतेच्या विचारांचा आमदार हवा आहे. विचार बदलला तर बदल होतो याची मतदाराला जाण असल्याने जनता आजी-माजी आमदाराला कंटाळली आहे. सत्तेचा दुरुपयायोग करणाऱ्यांना वैतागली असल्याने या निवडणुकीत मतदार आम्हला साथ देतील. आमचे व्हिजन तालुका राज्यात पुढे नेण्याचे आहे. दहा वर्षातील जुलमी राजवट संपवली आता निष्क्रियता संपवायची आहे. विकास कामांना बसलेली खीळ काढून टाकण्यासाठी कपबशी ला विजयी करा.
– अतुल देशमुख, अपक्ष उमेदवार, खेड-आळंदी मतदारसंघ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.