…त्यामुळे शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : राज्यात निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच निवडणुकीच्या सुरूवातीला सरकारकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना ईडीकडून नोटिस बजावण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. पात्रता नसताना राज्य सहकारी बॅंकेनं काही लोकांना कर्ज दिलं. बॅंकेने वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले. पैसा चुकीच्या पद्धतीनं वाटला, संपत्ती विकली, कोणालाही कर्ज दिलं अशा काही ठरावांमध्ये शरद पवार यांच्या निर्देशानुसार हे करण्यात आल्याची नोंद केली आहे. याव्यतिरिक्त काही पत्रदेखील आहेत. ज्यामध्ये शरद पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केली आहे. त्यामुळं अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी करण्यात येत आहे. याचा तपास ईडीकडून सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केल्याची पत्र पाठवली होती. त्याचा आधारदेखील बॅंकेने घेतला आहे. त्याचा क्रिमिनल अँगल आहे किंवा नाही हे तपासानंतर सिद्ध होईल. आपल्याकडे एखादी व्यक्ती आली म्हणून मी त्याला पत्र दिलं असंही पवार सांगू शकतात. त्यांनी पत्र दिल्यानंतर बॅंकेनं त्या पत्राच्या आधारावर आणि त्यातही शरद पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही कर्ज देत आहोत, अशी नोंद करून कर्ज वाटप करण्यात आलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचे ईडी नाट्य अतिशय गाजले होते. ईडीने चौकशीसाठी बोलावले नसतानाही शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. अनेकांच्या विनवण्यांनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी आपला निर्णय तहकूब केला होता. सध्या त्यांच्या चौकशीची गरज नसून येण्याची काही गरज नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते. तसंच भविष्यात गरज लागेल तेव्हा आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यांनतर तुम्ही येऊ शकता असे ईडीने स्पष्ट केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)