नवी दिल्ली : दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा ८ डिसेंबर रोजी अपघात झाल्यानंतर १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने बचाव कार्यात मदत केल्याबद्दल स्थानिक लोकांचे आभार मानले आहेत. पीडितांसाठी गावकरी ‘देवांसारखे’ असल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने तामिळनाडूच्या या ग्रामस्थांचे आभार मानत मदत करण्याचेही ठरवले आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, लष्कराने म्हटले आहे की, “तुमच्यापैकी अनेकांनी मदत केली. गावकऱ्यांच्या मदतीशिवाय १४ लोकांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नसते. एक हवाई दलाचा अधिकारी जिवंत आहे आणि तो बेंगळुरूचा आहे. तो हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. जर तो जिवंत असेल तर त्याचे कारण तुम्ही आहात.” तुम्ही त्या १४ लोकांसाठी देवासारखे होतात. तुमचे खूप खूप आभार, असेही भारतीय सैन्याने म्हटले आहे.
जनरल ऑफिसर कमांडिंग हेडक्वार्टर दक्षिण भारत, लेफ्टनंट जनरल ए अरुण यांनी सांगितले की, वाचलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह आपल्या आयुष्यासाठी लढत होते. गावकऱ्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, त्यांनी वरुण सिंग यांना जिवंत शोधण्यात मदत केली. गावात सभा व कार्यक्रमांसाठी शेड बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी भारतीय सैन्याच्या दक्षिण भारताच्या मुख्यालयाच्यावतीने हे गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आणि ब्लँकेट, रेशन साहित्य आणि सौर दिव्यांचे वाटप केले. लेफ्टनंट जनरल ए अरुण यांनी तामिळनाडू सरकार, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि विविध विभागांच्या सचिवांचे बचावकार्यात केलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले.
तामिळनाडूतील उटीजवळ कुन्नूर येथे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर बचाव पथकाला जनरल बिपिन रावत आणि ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यासह दोन जण जिवंत सापडले असल्याचा दावा बचाव पथकाच्या सदस्याने केला होता.
टाईम्स ऑफ इंडियाला वरिष्ठ फायरमन एनसी मुरली यांनी सांगितले होते की,“आम्ही दोन लोकांना जिवंत वाचवले. त्यामध्ये सीडीएस रावतही होते. आम्ही त्यांना बाहेर काढताच त्यांनी बचाव कर्मचाऱ्यांशी हळू आवाजात हिंदीत बोलून आपले नाव सांगितले.” त्यांच्या म्हणण्यानुसार, जनरल रावत यांच्या शरीराच्या खालच्या भागात गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.