पिंपरी -शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी घालण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. या वाहनांमध्ये जास्त वजन असल्याने तसेच, ट्रॅक्टरला एकापेक्षा जास्त ट्रॉली जोडल्याने ही वाहने संथ गतीने धावतात.
गेल्या काही दिवसांमध्ये उसाच्या ट्रॉलींना अपघातही झाले आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी रहदारीच्या वेळेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदीचे आदेश दिले आहेत.
या वेळेत असेल बंदी
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत बंदी असेल. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत शहरातून ऊस वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत ऊस वाहतूक करणारी वाहने शहरातून धावू शकतात.