योगोपचार ही प्राचीन भारतीय परंपरा असली तरीही सध्याच्या जमान्यात याचं फिटनेस रुटीन आणि बाजारीकरण होत आहे. त्याचसोबत यात अनेक बदल केलेले दिसतात. या आधुनिक ट्रेंडमुळे योगाला गेल्या काही वर्षात आगळेवेगळे स्वरूप आले आहे. पॉवर योगा, झुंबा, हॉट योगा, ऍरोबिक्स यासारखे आधुनिक अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
आजच्या स्ट्रेसफुल वातावरणात वावरत असताना स्वतःची क्षमता वाढवून फिटनेस राखणे गरजेचे झाले आहे. प्रदूषणामुळे वाढलेल्या अनारोग्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची आवश्यक आहे. प्रमाणबद्ध शरीर, शरीरातील कोलेस्टेरॉल आणि चरबी कमी करणे हेदेखील उद्देश आहेतच.
यावर उपाय म्हणून हल्ली योगोपचाराकडे बघितले जाते. म्हणूनच योगा-क्लासेसचे महत्त्वही हल्ली वाढले आहे; परंतु योगातील आसनांनाच आधुनिक टच दिल्यास अधिक प्रतिसाद मिळतो, हे लक्षात घेऊन नवे योगा प्रकार डिझाइन करण्यात आले आहेत.
अत्याधुनिक पर्याय
कॅलरी बर्निंग, वेट लॉस, मसल एक्झरसाइज अशी उद्दिष्टे ठेवून येणारेही आधुनिक योगामुळे या योग प्रकाराकडे वळले. यातूनच पॉवर योगा’चा उदय झाला. पॉवर योगप्रकार हल्ली “जिम योगा’ म्हणूनही ओळखला जातो. वजन कमी करणे हा पॉवर योगाचा महत्त्वाचा उपयोग आहे. पॉवर योगा शिकविण्याचा प्रकार प्रत्येक ट्रेनरप्रमाणे बदलत असतो. यासाठी 7 ते 8 हजार रुपये आकारण्यात येत आहेत.
बिक्रम योगा
“बिक्रम योगा’ हा आणखी एक योगाचा आधुनिक प्रकार आहे. 40 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बंद खोलीमध्ये 90 मिनिटांत 26 आसनं हे “बिक्रम योगा’चे स्वरूप आहे. गरम खोलीत हा योग प्रकार करत असल्याने हा “हॉट योगा’ या नावानेही तो ओळखला जातो.
क्लासिकल इंडियन योगा
“अष्टांग विन्यास योग’ नावाचा प्रकारही आघाडीवर आहे. क्लासिकल इंडियन योगा’ म्हणून हा प्रकार ओळखला जातो. याखेरीज झुंबा, ऍरोबिक्स यासारखे हटके प्रकार सध्याच्या पिढीला विशेष आकर्षिक करत आहेत. या प्रकारात आधुनिकता आहे, खास रिदमवर करण्यात येणारा हा प्रकार तासाला पाचशे ते आठशे रुपये घेऊन शिकवण्यात येतो. याशिवाय “लाफ्टर योगा’ हा प्रकारही हल्ली नावारूपाला आला आहे. वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सगळेच हा योगा करताना दिसतात.
ताल, सूर, लय, गीतांचे बोल असे शब्द आता नृत्यवर्गांसह जिममध्येही मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहेत. उकडलेल्या भाज्या, बेचव सॅलेड, तासन्तास केला जाणारा पारंपरिक व्यायाम यांना छेद देत ताला-सुरावर थिरकत आरोग्य साधणाऱ्या प्रकारांकडे तरुणांचा अधिक कल असून फिट राहण्याचा हा कलात्मक उपाय ज्येष्ठांसह लहानग्यांनाही भुरळ घालत आहे. वय वाढले की डॉक्टरांचा दवाखाना आणि जिम याकडे वळणाऱ्यांची पावलांची संख्या अधिक असते.
मात्र, व्यायाम उपकरणांवर धावणारी पावले आता चक्क नृत्यगीतांवर थिरकताना दिसतात, केवळ आकड्यांवर घाम घाळणे अनेकांना कंटाळवाणे वाटत असल्याने झुंबा, पॉवर योगासारख्या प्रकारांकडे वळणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यांसह अनेकांना बालपणी नृत्य शिकण्याची इच्छा असूनही ते शिकता येत नाही.
अशी अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठीही अनेकजण झुंबाचा पर्याय निवडतात. अशा प्रकारांमध्ये केवळ व्यायाम नसून कलेची जोपासना होते. त्यातील बहुतांश स्टेप्स या बॉलिवुड प्रकारांना धरून दिग्दर्शित केल्या जातात. व्यायाम आणि मनोरंजन असा दुहेरी मार्ग साधण्यासाठी झुंबा हा प्रकार अधिक रंजक वाटतो.
स्ट्रेस बस्टर डान्स…
कामाचे वाढते तास, कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण यांमुळे अनेक कंपन्यांमध्ये नृत्याची मागणी केली जात आहे. अशा स्ट्रेस बस्टर उपक्रमांसाठी स्वतंत्र वेळापत्रक आखण्यात येत असून कर्मचाऱ्यांना झुंबा, पॉवर योगा, बॉलिवूड डान्स यांचे प्रशिक्षण देण्यात येते. याकरिता विविध नृत्यप्रशिक्षकांना पाचारण केले जाते.
झुंबा फॉर किडस्
तरुण अथवा ज्येष्ठांना आकर्षित करणाऱ्या झुंबामध्ये आता छोट्यांची पावलेही थिरकतात.
आरोग्याबाबत जागृक असणाऱ्या पालकांच्या संख्येत वाढ झाल्याने छोट्यांनाही झुंबाचे प्रशिक्षण दिले जाते. याकरिता झुंबा किडस् या आगळावेगळा प्रकार शिकविला जातो. अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणासह झुंबाचे प्रशिक्षण देण्याकरिता आमंत्रण दिले जात आहे.
– श्रुती कुलकर्णी