मुंबई – ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (GIS-23) संदर्भात 16 देशांमध्ये आयोजित केलेल्या रोड शोच्या यशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः देशांतर्गत रोड शोची जबाबदारी घेतील. 5 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान देशातील नऊ मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या या रोड शोची सुरुवात मुंबईतून होणार आहे. आणि यासाठीच सीएम योगी काल पासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर पोहोचले. उत्तर प्रदेशात उद्योग स्नेही वातावरण तयार व्हावं आणि गुंतवणूक वाढावी यासाठी योगींचा मुंबई दौरा आयोजित केलाय.
दरम्यान, काल योगी आदित्यनाथ यांनी काही बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केलीय. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचं यातून दिसून येत आहे. यावेळी त्यांनी ‘एसबीआय, कोटक महिंद्रा बॅंक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंक, यस बॅंक, एसआयडीबीआय, इंडिया एक्सिम बॅंक, आयडीबीआय बॅंक, बॅंक ऑफ बरोडा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बॅंक’ इत्यादी बँकांच्या अधिकाऱ्यांशी महत्वाची चर्चा केली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यातील विरोधकांनी मात्र योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता.