लखनौ – उत्तरप्रदेश सरकारने राज्यात पोलिस अनुमतीशिवाय कोणतीही धार्मिक मिरवणूक काढण्यास मनाई केली असून इतरांना त्रास होईल अशा स्वरूपात लाऊडस्पीकरचा वापर केला जाऊ नये, असे आदेश जारी केले आहेत. काही राज्यांमध्ये अलिकडच्या काळात सणांदरम्यान हिंसक घटना घडल्यामुळे योगी सरकारने हे नवे आदेश जारी केले आहेत. ईद सण आणि अक्षय तृतीया पुढील महिन्यात एकाच दिवशी येत आहेत. आणि येत्या काही दिवसांत इतर अनेक सण आहेत, त्यामुळे पोलिसांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्यात सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेण्यात आला. माईक वापरता येत असले तरी, त्याचा आवाज आवारातून बाहेर येणार नाही याची खात्री करा. इतर लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, अशी सुचना मुख्यमंत्र्यांनी केली.
नवीन साइटवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी कोणतीही परवानगी दिली जाऊ नये असा आदेशही त्यांनी पोलिसांना दिला आहे. धार्मिक कार्यक्रम आणि पूजा केवळ नेमून दिलेल्या ठिकाणीच व्हाव्यात आणि ‘धार्मिक कार्यक्रमांमुळे रस्ते किंवा वाहतूक विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी 4 मे पर्यंत सर्व पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आणि रजेवर असलेल्या सर्वांना 24 तासांच्या आत ड्युटीवर हजर राहण्यास सांगितले आहे.