रायबरेली. (उत्तर प्रदेश), – उत्तर प्रदेशातील इयत्ता दहावीतील एका दलित विद्यार्थ्याला पाय चाटायला लावल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि आठ जणांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
दिनांक 10 एप्रिलला जगतपूर गावातील या मुलाला त्याच्या मित्राने मोटरसायकलवरून रामलीला मैदानावर नेले. तेथून अन्य काही जणांनी मिळून या मुलाला जवळच्या एका बागेत नेले. तेथे या मुलाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर त्या मुलाला अन्य एका व्यक्तीचे पाय चाटायला लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हा मुलगा आणि त्याच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या मुलाला अशी अपमानास्पद वागणूक का देण्यात आली, याचे कारण मात्र पोलिसांनी सांगितले नाही. कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे, असे धलमू परिमंडळाचे अधिकारी अशोक सिंह यांनी सांगितले.