मुंबई – आंतरराष्ट्रीय योग दिन आज विविध ठिकाणी साजरा केला जात आहे. विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहिले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी योगा केला. याचे काही फोटो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी नेते उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना फडणवीस आणि शिंदे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘धकाधकीच्या आयुष्यात योग ही काळाची गरज असून ही लोक चळवळ झाली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आपल्या देशाने योग ही आरोग्याची गुरुकिल्ली संपूर्ण जगाला दिली आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये असंख्य मंडळींनी एकाच वेळी योग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा’, असे आवाहन यावेळी एकनाथ शिंदेंनी केले.
शरीर, मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताण तणाव वाढले आहे. या ताण तणावावर योग हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. योग साधनेमुळे असाध्य आजारही बरे होतात. आज राज्यात सर्वदूर योग दिनाचे अनेक कार्यक्रम होत आहेत हे निश्चितच आनंदाची आणि… https://t.co/vjiejhSeXM pic.twitter.com/ic2flSragO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2023
तर दुसरीकडे, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस विक्रांतवर योगा केला आहे. केरळ मधील कोचीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख, अॅडमिरल आर हरी कुमार यांनी आयएनएस विक्रांतवर योगा केला. त्यांच्या सह यावेळी अनेक जवानांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. याशिवाय भाजप नेते नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यासह अनेक राजकीय मंडळींची योगदिनानिमित्त योगासने करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.