पुणे – यंदा पिफ मध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभागात ‘वाय’ हा चित्रपट दाखवण्यात आला. ‘वाय’ हा चित्रपट स्त्रीभ्रूण हत्त्येवर आहे. चार वेगवेगळ्या कथानकांना जोडत हा सामाजिक समस्येचे पैलू उलगडत जाणारा चित्रपट आहे. यातील एका गोष्टीत एका महिलेचा या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींविरुद्धचा, समजाविरुद्धचा लढा आहे.
चित्रपटात चार मुख्य कथा असून त्यांना एका सूत्रात बांधणारा केंद्रबिंदू म्हणजे हॉस्पिटल आहे. त्यामुळे हा चित्रपट अनेक स्तरांतून जातो. यातील दोन कथांमध्ये स्त्रीभ्रूण हत्त्येचे मागणी, एकात समजातून होणारा पुरवठा आणि एकात या सगळ्याला थांबवू पाहणारी संस्था अशा प्रकारचा आशय मांडण्यात आला आहे.
कथा काल्पनिक असल्या तरी त्या मनाला भिडतात, एका पातळीवर तुम्हाला सुन्न करतात आणि पुन्हा विचार करायलाही भाग पडतात. विषय गंभीर असला तरी प्रेक्षकांचे मनोरंजनही हा चित्रपट करत असल्याचे वाडीकर यांनी सांगितले.
आशयघन चित्रपट बऱ्याचदा महोत्सवापुरते मर्यादित राहतात असे वाटते. मात्र त्याचे पडसाद काही काळाने का असेना आपल्याला दिसतातच. ती संकल्पना पुन्हा नव्या रुपात समोर येते आणि समाजापर्यंत नक्कीच पोहचते. असे चित्रपट प्रेरणादायी नक्कीच ठरतात, असे अभिनेता नंदू माधव यांनी सांगितले.