पुणे – यंदा पिफ मध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभागात ‘तुझ्या आईला’ हा चित्रपट दाखवण्यात आला. वडिलांच्या सरकारी नोकरीच्या नियमित बदलीमुळे अविनाश शहरातून एका दुर्गम भागातील खेड्यात बदली होऊन जातो. तेथे गेल्यावर शाब्दिक हिंसेच्या खेळात तो अडकतो. या संकल्पनेच्या भोवती ‘तुझ्या आईला’ हा चित्रपट फिरतो.
शिवी देणे किंवा शब्दांनी इजा पोहचविणे ही गोष्ट फार सामान्य समजली जाते. शारीरिक हिंसे विषयी खूप बोलले जाते मात्र शाब्दिक हिंसे विषयी मराठीत तरी अजून कोणी बोललेले नाही. म्हणून या संकल्पनेवर चित्रपट बनविण्याचे ठरवल्याचे दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले. “यामागे माझा एक वैयक्तिक अनुभव विशेष कारणीभूत ठरला. मी चित्रपट दिग्दर्शित करत असताना जर कोणी काम नीट नाही केले तर मी लगेच त्याला शिवी हासडत असे. त्यामुळे काम पटकन होते असे माझ्या लक्षात आल्यावर ती माझी सवय झाली. पण माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी अशीच कोणाला दिलेली शिवी त्या व्यक्तीने लक्षात ठेवली आणि ७ वर्षाने त्या व्यक्तीला भेटल्यावरही त्याच्या मानत माझी तीच प्रतिमा आहे हे माझ्या लक्षात आल्यावर मला खूप वेदना झाल्या. आपल्या नकळतही आपण किती हिंसा करतो हे जाणवल्यावर त्यावर काहीतरी करण्याच्या जाणीवेतून हा चित्रपट तयार झाला.”
खेड्यात, होस्टेलमध्ये अशा शिव्या देण्याचा खेळ खेळला जातो. बरेच शिक्षकही मुलांशी बोलताना अशाच पद्धतीच्या भाषेचा वापर करतात. त्यामुळे या शाब्दिक हिंसेचे धडेही शाळेतूनच मुले गिरवू लागतात. याविषयी विचार होणे ते थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे चित्रपटात अशी शाब्दिक व शारीरिक हिंसा काही प्रमाणात दाखविली असली तरी शेवटी संदेश अहिंसेचा दिला आहे, असेही डहाके म्हणाले. शिवाय हा चित्रपट स्त्रीवादाकडे झुकणारा असून शिवी कायम आई आणि बहिणीवरूनच का असते? असा सवालही विचारतात.
शाळा चित्रपट ‘पिफ’ मध्ये दाखवला गेला होता त्यानंतर परत ‘पिफ’ मध्ये यायला ९ वर्ष लागली. मात्र यंदा तरी आपला चित्रपट या महोत्सवात पोहचू शकल्याचा आनंद सुजय डहाके यांनी व्यक्त केला.