वूडसाईड. बीजिंग – अमेरिका आणि चीनच्या लष्करादरम्यान थेट संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याला अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहमती दर्शवली आहे. याशिवाय दोन्ही देशांदरम्यान अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील सहकार्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली आहे.
चीन आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये आज प्रत्यक्ष भेट झाली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी परस्पर संबंध सुधारण्याच्या दृष्टीने विविध मुद्यांवर सहमती दर्शवली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेच्या निमित्ताने झालेल्या या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमधील सुधारणांसाठीच्या संवादाचे महत्वही दोन्ही नेत्यांनी मान्य केले.
बायडेन आणि जिनपिंग यांनी महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर आपल्या मतांचे आदान प्रदान केले. मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संलग्न, सुरक्षित आणि सहिष्णूतेला आपला पाठिंबा असल्याचे बायडेन यांनी यावेळी अधोरेखित केले. हिंद-प्रशांत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्रामध्ये सागरी व्यवहार, शांतता आणि स्थैर्य अबाधित राखण्याला आणि कोरियाच्या द्विपसमुहामध्ये पूर्ण निश्स्त्रीकरण करण्याला आपला पूर्ण पाटिंबा असल्याचेही बायडेन यांनी जिनपिंग यांना सांगितले.
तैवानच्या सार्वभौमत्वाला अमरिकचा पाठिंबा असल्याचे चीनला आवडत नसल्याचे या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले. तैवानसह चीनच्या एकिकरणाचे प्रयत्न सुरूच ठेवण्यात येतील, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. चीनच्या “वन चायना’धोरणाला आपला विरोध नसून तैवानमधील अध्यक्षीय निवडणुकांमध्ये अमेरिका हस्तक्षेप करणार नाही, याचा बायडेन यांनी पुनरुच्चार केला.
चर्चा उपयुक्त आणि फलदायी- बायडेन
बाली येथे झालेल्या “जी-20’बैठकीच्यावेळी चीन-अमेरिकेदरम्यानच्या आणि सर्व जगासाठी महत्वाच्या विषयांवर सर्व सदस्य देशांमध्ये चर्चा झाली होती, मात्र थेट चर्चेला पर्याय नाही. आज झालेली चर्चा मोकळेपणे झाली. शी जिनपिंग यांना आपण दीर्घकाळापासून ओळखत आहोत. हे त्यांनी कधीच मान्य केले नाही. मात्र त्याबद्दल कोणालाच आश्चर्य नाही. आमच्यातील बैठक नेहमीच थेट आणि उपयुक्त राहिली होती, असे बायडेन यांनी सांगितले.
स्पर्धेमुळे दोन्ही दशांचे नुकसान- जिनपिंग
जिनपिंग यांच्या कार्यकाळामध्ये चीनच्या अर्थकारणाची गती मंदावली असल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या गरजेवर जिनपिंग यांनी विशेष भर दिला. तणाव आणि संघर्ष दोन्ही बाजूंसाठी असह्य परिणाम देणारे आहेत. दोन्ही देशांमधील स्पर्धा विद्यमान स्थितीला अनुसरून नाही. या स्पर्धेमुळे दोन्ही देशांमधील समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत, असे जिनपिंग म्हणाले. मात्र त्याच वेळी तैवानबाबतच्या अमेरिकेच्या धोरणाविषयी त्यांनी चिंताही व्यक्त केली.