World Test Championship (2023-2025) Points table : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही मोठा फायदा झाला आहे.
या सामन्यापूर्वी पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाने मोठी झेप घेतली आहे आणि थेट अव्वल स्थान गाठलं आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला असून गुणतालिकेत अव्वल स्थान गमावले आहे. भारताचे आता 54.16 टक्के गुण आहेत, तर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे 50 टक्के गुण आहेत.
जाणून घ्या.. सर्व संघांची स्थिती काय आहे?
1. भारताने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन जिंकले आणि एक पराभव झाला, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारत 26 गुणांसह अव्वल आहे आणि एकूण गुणांची टक्केवारी 54 टक्के आहे. भारताला आता इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
2. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने भारताविरुद्धच्या चालू मालिकेतील होते. एका सामन्यात त्याने विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 24 पैकी 12 गुण मिळवून आफ्रिकन संघाने 50 टक्के गुण मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
3. न्यूझीलंड संघाने कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात केवळ दोन सामने खेळले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील एका सामन्यात किवी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यात संघाला यश आले. 50 टक्के गुणांसह न्यूझीलंड संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तथापि, त्याच्या गुणांची संख्या आणि गुणांची टक्केवारी दक्षिण आफ्रिकेसारखीच आहे.
4. ऑस्ट्रेलियन संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू चक्रात सर्वाधिक सात सामने खेळले आहेत. त्यापैकी चारमध्ये त्यांना विजय मिळाला आहे, तर दोनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. 42 गुणांसह कांगारू संघाने 50 टक्के गुण मिळवले आहेत. कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. तथापि, त्यांच्या गुणांची टक्केवारी दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड सारखीच आहे.
5. बांगलादेशची अवस्था न्यूझीलंडसारखीच आहे. या संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू चक्रात केवळ दोन सामने खेळले आहेत. एकात ते जिंकले, तर दुसऱ्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन सामन्यांतून 12 गुणांसह बांगलादेशची गुणांची टक्केवारी 50 आहे. त्यांची गुणांची टक्केवारी देखील दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका, तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आणि चौथ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियासारखीच आहे. मात्र, पुढे जाऊन ही कामगिरी कायम राखणे बांगलादेशसमोर मोठे आव्हान असेल. हा संघ ICC टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे, पण पुढचा सामना जिंकल्यास दुसऱ्या स्थानावर किंवा अगदी अव्वल स्थानावर येऊ शकतो.
6. सध्याच्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानने चार सामने खेळले आहेत. त्यापैकी दोनमध्ये त्यांना विजय मिळाला आहे, तर दोनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, स्लो ओव्हर रेटमुळे या संघाला दोन गुणांचा दंड ठोठावण्यात आला असून पाकिस्तानचे 22 गुण आहेत. 45.83 टक्के गुण मिळवून हा संघही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. गुणतालिकेत अव्वल सहा संघांमधील गुणांच्या टक्केवारीतील फरक खूपच कमी आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता खूप जास्त आहे.