कुस्त्या बंद; खुराकाअभावी पहिलवानांचे हाल

औंध कुस्ती केंद्रातील खेळाडू दत्तक

औंध – करोना विषाणूचा समाजातील सर्वच घटकांवर परिणाम जाणवत असताना तालमीत वर्षानुवर्षे मेहनत घेत शरीर कमावणाऱ्या पहिलवानांनाही याची आर्थिक झळ बसली आहे. कुस्त्यांची मैदाने होत नसल्यामुळे यातून येणाऱ्या बक्षिसांच्या पैशांमधूनच आपला खुराक भागवणाऱ्या पहिलवानांवरही उपासमारीची वेळ आली आहे, अशातच पहिलवानांना दत्तक घेण्यासाठी समाजातील काही दानशूर संस्था, व्यक्ती पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

औंध कुस्ती केंद्रात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील पहिलवान सराव करण्यासाठी येतात. हे खेळाडू कुस्ती केंद्रातच राहतात. परंतु, करोना आणि त्यानंतरच्या उद्‌भवलेल्या स्थितीमुळे हे खेळाडू हतबल झाले आहेत. यामुळे या पहिलवान खेळाडूंचा एक वर्षाचा पूर्ण खर्च उद्योगपती अविनाश कांबळे यांच्या सुखाई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात येणार आहे.

याबाबत कांबळे म्हणाले की, नामवंत खेळाडू परिस्थितीमुळे कुस्ती खेळातून मागे राहण्याची शक्‍यता आहे. आयुष्यातील गेली अनेक वर्षे काही पहिलवानांनी कुस्ती योगदानात घालविली आहेत. करोनाच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत केलीच पाहिजे. कुस्ती मैदान, आखाडे, स्पर्धा नसल्यामुळे पहिलवान मुलांवर उपासमारीची वेळ आली होती, अशात मिळालेली मदत खूप मोलाची असल्याचे औंध कुस्ती केंद्राचे अध्यक्ष विकास रानवडे यांनी सांगितले. यावेळी युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, राष्ट्रीय खेळाडू अभिषेक कांबळे, विराज रानवडे, वस्ताद दिलीप रानवडे, बाळासाहेब रानवडे, अशोक गायकवाड, मयूर जुनवणे, निखिल पाटील उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.