मार्केट यार्डात दशेरी, चौसा आंब्याचीही आवक
पुणे – चवीला गोड असलेल्या उत्तर प्रदेशातील दशेरी, चौसा आणि लंगडा या आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात या आंब्याची आवक सुरू झाली आहे. रत्नागिरी हापूस आंबा संपल्यानंतर नागरिक आतुरतेने या आंब्याची वाट पाहत असतात.
उत्तर प्रदेश येथील बनारस येथून चौसा आंबा, इलाहाबाद येथून लंगडा आंबा तर मालियाबाद येथून दशेरी आंबा पुण्यातील मार्केट यार्डात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने या आंब्याचा हंगाम असतो. सध्या, बाजारात दररोज पाच किलोच्या साधारणतः 1400-1500 बॉक्स तर किलोच्या 1000-1200 लाकडी पेटी आवक होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील आंब्याचे व्यापारी सलिम बागवान यांनी दिली. या आंब्याला शहरासह, उपनगरातून मागणी आहे.