रांजणगाव गणपती -पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व शिरूर तालुका कुस्तीगीर संघांच्या मान्यतेने व अजिंक्यतारा कला क्रिडा प्रतिष्ठान व रांजणगाव ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती स्पर्धांचे रांजणगाव गणपती येथे दि. 22 एप्रिल ते 24 या कालावधीत आयोजन केल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी रांजणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झेंडू पवार, शिक्रापुरचे माजी उपसरपंच रामभाऊ सासवडे, कानिफ गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूर तालुक्यामध्ये कुस्ती खेळाला एक वेगळे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी साधारणतः वीस वर्षांपूर्वी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा भरवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे तालुक्यांमध्ये पैलवानांची संख्या वाढेल, असा मानस मनात ठेवून पैलवान मंगलदास बांदल यांच्या मार्गदर्शनानुसार अजिंक्यतारा कला क्रिडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिरूर तालुक्यामध्ये कुस्ती स्पर्धा भरवण्यात मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली.
एखाद्या गावामध्ये स्पर्धांचे आयोजन केले जात असे. मात्र करोना महामारीमुळे दोन वर्षापासून या स्पर्धा थांबल्या होत्या. मात्र, रांजणगाव करांच्या आग्रहामुळे व महागणपतीच्या आशीर्वादामुळे स्पर्धा पुन्हा नव्या जोशात व जोमात सुरू झाल्या आहेत, असे प्रतिपादन माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी व्यक्त केल्या.
यावर्षी रांजणगाव गणपती येथे स्पर्धा दि. 22 ते 24 एप्रिल या कालावधीमध्ये महागणपती मंदिरा शेजारील वाहनतळावर घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिवसेना नेते सचिन आहिर, खासदार, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, प्रकाश धारिवाल, केशरताई पवार, स्वप्निल ढमढेरे, राजेंद्र नरवडे, शशिकांत दसगुडे,
आबासाहेब सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बांदल परिवाराकडून विठ्ठलराव बांदल यांच्या स्मरणार्थ शिरूर केसरीच्या मानकरी पैलवानास मानाची गदा देण्यात येते. त्याच धर्तीवर ती चांगदेव होलगुंडे यांच्या स्मरणार्थ रेखाताई बांदल यांच्यावतीने शिरूर केसरी महिला पैलवाना साठी मानाची गदा भेट देण्यात येणार असल्याचे शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झेंडू पवार यांनी सांगितले.