मांजरी –मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीमार्गे वाघोलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट-कॉंक्रिटीकरणाचे काम पीएमआरडीएकडून करण्यात येत आहे. परंतु, कंत्राटदाराकडून ठिकठिकाणी अधर्वट काम करून रस्ता सर्वत्र खोदून ठेवला आहे. सुरक्षिततेबाबत कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेली नाही. पीएमआरडीए आणि वाहतूक विभागाचेही याकडे दुर्लक्ष आहे.
मांजरी बुद्रुक येथे रेल्वेगेट ते मांजरी बुद्रुक स्मशानभूमी, असा वाघोलीकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून करण्यात येत आहे. रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या बाजूने या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम के.के.घुले चौक आणि पुढे स्मशानभूमीच्या कॉर्नर पर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. मात्र, ठिकठिकाणी काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जुन्या रस्त्याला लागून असलेल्या रस्त्याचा भाग जेसीबीने खोदण्यात आला. त्यामुळे सध्या एकाच बाजूने दोन्ही दिशेकडील वाहतूक सुरू आहे. मांजरी खुर्द व वाघोलीकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्याने मोठी वर्दळ असते. त्यातच दोन्ही दिशांकडील वाहतूक एकाच बाजुने सुरू आहे. कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून रस्त्याच्या बाजूला सुरक्षा दुभाजक लावणे अपेक्षित आहे. शिवाय सूचना फलकही हवेत. परंतु, तशा कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत संबंधीत कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
रस्त्याचे काम करताना पीएमआरडीए तसेच वाहतूक विभाग यांच्या नियमांची पायमल्ली करत कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कारणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यावर संबंधित यंत्रणा जागी होणार का? रस्ता करताना वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित असावी यासाठी ठेकेदाराने काळजी घेतली पाहिजे. परंतु, येथे त्या उलट चित्र आहे. तेव्हा पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
– राजेंद्र साळवे, अध्यक्ष, अखिल मांजराई नगर नागरिक कृती समिती
मांजरी रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असून सगळीकडे समान जागा संपादन केली नाही.वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसून रात्रीच्या वेळी अपघात होऊन अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पीएमआरडीएने योग्य वेळी दखल न घेतल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करू.
– शैलेंद्र बेल्हेकर, भाजपा प्रचार प्रसिद्धी प्रमुख, हडपसर विधानसभा मतदारसंघ