गेल्या आठवडाभरात राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात वायू प्रदूषणामुळे लोकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दुसरीकडे, गेल्या एक महिन्यापासून करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्येही चढ-उतार होत आहेत.
दरम्यान, वाढत्या वायू प्रदूषणामुळे करोनाच्या धोक्याबाबत लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. स्पेनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे करोनाचा संसर्ग वाढल्याने आधीच संसर्ग झालेल्या लोकांमध्ये त्याचा गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका वाढला आहे.
जर्नल एन्व्हायर्नमेंटल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी संसर्गजन्य रोगांवर पर्यावरणीय घटकांचा प्रभाव वर्णन केला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की करोनाच्या या काळात वायू-प्रदूषण वाढल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
दुसरीकडे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्यास करोनाचा धोका तसेच इतर गंभीर आरोग्य समस्याही कमी होऊ शकतात. चला, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हवेतील संसर्गाचा वाढता धोका
संशोधकांच्या मते, हवेच्या प्रदूषणामुळे करोना विषाणूचा हवेतून संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. हवेतील संसर्गामुळे कोणत्याही ठिकाणी जास्त लोकांना विषाणूची लागण होऊ शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की, मागील अभ्यासात असे दिसून आले होते की ज्या ठिकाणी वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त होते तेथे कोविड-19 प्रकरणे आणि मृत्यूचे प्रमाण जास्त होते. करोना विषाणूला हवेत दीर्घकाळ राहण्यासाठी हवेतील प्रदूषण हे एक माध्यम ठरू शकते.