बारामती – बारामती-पाटस रस्त्यावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान सोनवडी सुपे फाट्याजवळ घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. ट्रकखाली चिरडून दाम्पत्याचा जागीच अंत झाला. काळूराम गणपत लोंढे आणि शाकूबाई काळूराम लोंढे असे अपघातात मृत्यू पावलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मालवाहू ट्रक पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर स्पेलंडर दुचाकीवरून दाम्पत्य बारामतीच्या दिशेने निघाले होते. यावेळी भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने या ट्रकने थेट दुचाकीस धडक दिली. दुचाकीवरील दोघेही ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.