लखनऊ : देशातील सर्वाधिक काळ वादातीत असणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा येत्या ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. मात्र त्या अगोदर मंदिरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मंदिरातील पुजारी आणि तिथे तैनात असणाऱ्या १६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या बातमीमुळे काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या भूमिपूजन सोहळ्यावर चिंतेचे ढग घोंगावताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशच्या अयोध्येत पुढच्या आठवड्यात राममंदिराच्या भूमी पूजनाचा सोहळा पार पडणार आहे. मात्र मंदिराचे पुजारी प्रदीप दास आणि मंदिरातील सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या १६ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे प्रदीप दास हे शिष्य आहेत.तसेच राम लल्ला च्या भूमिपूजन सोहळ्यासाठी ते सहभागी होणार होते. यावेळी मंदिरात ४ पुजारी असून सत्येंद्र दास यांच्यानंतर प्रदीप दास यांचाच क्रमांक लागतो. दरम्यान, मंदिर परिसरात राहणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याने अयोध्येत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ५ ऑगस्टला पंतप्रधान मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे इथली व्यवस्था ही निरोगी आणि सुरक्षित राहणे गरजेचे आहे.