पुणे – टाळेबंदीनंतर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. याबाबीचा विचार करता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्यावतीने नोकरीकरीता इच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी तिसऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना किंवा कंपन्यांमधील विविध रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे. या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे वेल्डर, पेंटर, फिटर, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, शीटमेटल वर्कर, एमएमटीएम, मशीन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, ग्राईडर, टर्नर यासारखे आयटीआय ट्रेड व एनसीटीव्हीटी या सारख्या पदासाठी आवश्यक त्या तांत्रिक पात्रताधारक उमेदवारांसाठी एकूण 3 हजार 85 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करून दिली आहेत.
ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी 4 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.
नोंदणीसाठी संकेतस्थळ : www.rojgar.mahaswayam.gov.in