पुणे, दि. 30 – वर्ल्ड वेगन डे अर्थात जागतिक शाकाहार दिन दरवर्षी दि.1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर रविवारी “वेगन इंडिया मुव्हमेंट’तर्फे पुण्यातील कार्यकर्त्यांनी “फेस द ट्रूथ’ (सत्याला सामोरे जा) आणि “लिबरेशन फॉर ऑल’ (सर्वांसाठी मुक्ती) या ब्रीदवाक्याअंतर्गत शाकाहारी जीवनशैलीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अन्न, वस्त्र, प्रयोग, मनोरंजन किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी सर्व प्राण्यांना वापर, शोषण, अत्याचार आणि क्रूरतेपासून मुक्त जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे या कार्यक्रमातून सांगण्यात आले.
जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाजवळ आयोजित या कार्यक्रमात “व्हेगन इंडिया मुव्हमेंट’च्या कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हातातील लॅपटॉप आणि टॅबद्वारे विविध उद्योगांमध्ये प्राणी सहन करत असलेल्या भीषणतेची छायाचित्रे आणि चित्रफिती प्रदर्शित केल्या.
माणसाच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी प्राण्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या भीषण वास्तवाची जाणीव नागरिकांना करून देणे आणि त्यांना शाकाहारी होण्यासाठी प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. लोकांनी शाकाहारी जीवनशैलीचा अवलंब करून प्राण्यांच्या शोषणापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
असे अनेक भारतीय पदार्थ आहेत जे शाकाहारी आहेत, एकदा तुम्ही त्या मानसिकतेत आल्यानंतर कोणालाही शाकाहारी होणे सोपे जाते. त्यामुळे मांसाहार आणि प्राण्यांच्या अन्य उत्पादनांचा वापर करून प्राण्यांना होणारे दुःख आणि वेदनांमध्ये अधिक भर घालू नये.
– अमजोर चंद्रन, “वीगन इंडिया मूव्हमेंट’चे आयोजक
आपण काय करू शकतो
प्राणीजन्य पदार्थांचे सेवन न करणे
प्राण्यांवर चाचणी केलेली सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांवर बहिष्कार
प्राण्यांची त्वचा आणि केसमुक्त पोशाख किंवा फॅशनची निवड
प्राण्यांचा समावेश असलेली सर्कस न पाहणे
प्राणीसंग्रहालयांना भेट न देणे
पाळीव प्राणी खरेदीऐवजी प्राणी दत्तक घेणे