ओटावा :- कुस्ती खेळातील महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू व तीन वेळचे महाराष्ट्र केसरी विजेते आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकले आहे.
वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरी यांनी उपांत्य फेरीत त्यांच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याचा सामना केला. त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा 11-08 अशा फरकाने पराभव केला.
अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर 10 गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत भारताला 125 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.
चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते. महाराष्ट्र राज्यातील एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित कुस्तीपटू विजय चौधरी आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून भारताचे नवीन रेस्लींग सेंसेशन बनले आहेत.