नवी दिल्ली :- चार देशांच्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सोमवारी प्रमोद भगत व सुकांत कदम या भारताच्या स्टार पॅरा खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. एसएल3 व एसएल4 गटात पुरुष दुहेरीत या जोडीने ही कामगिरी केली. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरु आहे.
एसएल3 गटात एकेरीत प्रमोद भगतने रजतपदकही पटकावले. तसेच त्याने मिश्र गटात मनीषा रामदासच्या साथीत खेळताना ब्रॉंझपदक मिळवले. पुरुष दुहेरीत प्रमोद व सुकांत या जोडीने भारताच्याच दीप रंजन बिसोयी व मनोज सरकार जोडीचा 21-17, 21-17 असा पराभव केला.
एकेरीत प्रमोदला इंग्लंडच्या डॅनियल बेथेलकडून 8-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र गटातही प्रमोदला मनीषाच्या साथीत खेळताना इंडोनेशियाच्या हिकमत रामदानी व लेयनी रीत्री ओक्तीला या जोडीकडून 17-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
सुकांतला उपांत्य फेरीत एकेरी गटात इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावानकडून 21-17, 15-21, 16-21 अशी हार सहन करावी लागली.