नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय पारंपरीक औषधांचे एक जागतिक केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतातच हे केंद्र स्थापन केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे जयपुर आणि जामनगर येथे सुरू करण्यात आलेल्या आयुर्वेद संस्थांचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमाला जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसूस हे उपस्थित होते त्यावेळी बोलताना त्यांनी आज ही घोषणा केली. ते म्हणाले की पारंपारीक औषध आणि उपचार पद्धतीही आरोग्यसाठी पुरक पद्धती असून भारतात आम्ही हे नवे केंद्र स्थापन करून त्याद्वारे या पारंपारीक औषध पद्धतीचे संशोधन, प्रशिक्षण, आणि जनजागृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेने सन 2014 ते 2023 या काळासाठी पारंपरीक औषधांच्या संबंधात जे धोरण आखले आहे त्याला बळकटी देण्याचे काम भारतातील या केंद्राकडून होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आयुर्वेद ही भारताची प्राचीन मौलीक संपत्ती आहे. हा एक समृद्ध वारसा आहे. त्याचा प्रसार झाला तर त्यातून मानवतेचे कल्याणच होणार आहे. भारताची ही प्राचीन वैद्यकीय पद्धती अन्य देशातही अवलंबली जाणार असेल तर त्याचा भारतीय नागरीकांनाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी नमूद केले.