मुंबई – रोहित शर्माची दुखापत कोणत्या स्वरूपाची होती आणि रोहित आता कितपत तंदुरुस्त आहे याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. रोहित आणि बीसीसीआय यांच्यात सर्व बाबींबद्दल चर्चा होत असणार यात शंकाच नाही, पण जेव्हा चाहत्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही, तेव्हा चर्चांना मात्र उधाण येतं.
माझीदेखील तीच अवस्था आहे. नक्की रोहित आणि बीसीसीआय यांच्यात काय सुरू आहे हे समजतच नाहीये, असं मत माजी कसोटीपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी एका पाकिस्तानी यू-ट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.
यावरून रोहितच्या तंदुरूस्तीबाबत नीट माहिती मिळत नसल्याने संजय मांजरेकर पुन्हा चिडलेले असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाशी मालिका खेळायची असते, तेव्हा प्रत्येक खेळाडूची तंदुरुस्ती महत्त्वाची असते. त्यामुळे रोहितच्या तंदुरुस्तीबद्दल अधिकृत माहिती कळायला हवी, असेही ते म्हणाले.