जोहान्सबर्ग – दक्षिण अफ्रिकेत करोनाचा नवीन प्रकारचा विषाणू अस्तित्वात आल्यानंतर जगभरातील देशांनी त्यांच्या विमानांना आणि त्यांच्या देशात विमाने पाठवण्यावर बंदी घातली आहे.
त्या निर्णयावर जागतिक आरोग्य संघटनेने टीका केली असून या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक मात्शीदो मोएती यांनी म्हटले आहे की या देशांनी विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावलीचा अभ्यास करावा आणि विमान प्रवाशांवरील प्रवास निर्बंध टाळावेत.
अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे कोविडचा प्रसार रोखण्यास मदत होत असली तरी त्याचा अनेकांच्या जीवनावर आणि लोकांच्या जगण्यावर विपरीत परिणाम होत असतो हे लक्षात घेणे गरजेचे असते. जरी दक्षता म्हणून निर्बंध लागू केले जाणार असतील तरीही ते अवाजवी आणि लोकांच्या वावरण्यावर अतिक्रमण करणारे नसावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारचा कोणताही निर्णय वैज्ञानिक आधारावर घेतला जावा असे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण अफ्रिकेने नव्या विषाणुबाबत जागतिक आरोग्य संघटनेला त्वरेने माहिती दिल्याबद्दल त्यांनी दक्षिण अफ्रिकेचे आभार मानले आहेत.
ही माहिती धाडसाने जगाला देण्याच्या त्यांच्या कार्याचे कौतुकच व्हायला हवे आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रसंगात विमान प्रवासावर बंदी हा काही परिणामकारक उपाय नाही. अशा उपायाने अर्थकारणाला बाधा येते याची जाणिवही या देशाने ठेवली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.