वॉशिंग्टन – अमेरिकेची सत्ता सोडण्यास तयार नसलेल्या ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी हे सत्तांतरण लांबवण्यासाठी बायडेन यांना विविध प्रांतातून मिळणारी मतमोजणीच्या विजयाची सर्टिफिकीट जारी करण्याची प्रक्रियाच लांबवण्याची खेळी चालवली असल्याचे वृत्त आहे.
सर्वच ठिकाणच्या मतमोजणीला कोर्टांमध्ये आव्हाने देऊन आणि कायदेशीर अडचणी निर्माण करून बायडेन यांना विजयाची प्रमाणपत्रे जारी करण्यास विलंब करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार अनेक प्रांतातील कोर्टांमध्ये यासाठीच्या याचिका दाखल केल्या जाऊ लागल्या आहेत.
पेनसिलव्हेनीया, मिशिगन, आणि ऍरीझोना या प्रांतात त्यांनी असे प्रयत्न केले आहेत. बाद झालेली मते या प्रांतांमध्ये मोजली गेली आहेत असे ट्रम्प यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तथापि त्यांनी त्याच्या पुष्ट्यर्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे त्यातून बायडेन यांचे काही नुकसान होण्याची शक्यता नाही असे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मतदान किंवा मतमोजणीत कोणतीही हेराफेरी झालेली नाही असे तेथील निवडणूक यंत्रणेने छातीठोकपणे सांगितले असून त्यांनी ट्रम्प यांचे आक्षेप या आधीच फेटाळले आहेत. मतमोजणी झालेल्या प्रांताचे गव्हर्नर त्या प्रांतातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराच्या नावाने अधिकृत प्रमाणपत्र जारी करीत असतात.
अनेक प्रांतात अजून ही प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. तथापि नियमीत प्रक्रियेनुसार हे काम पुर्ण केले जाईल असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे.