नवी दिल्ली, दि. 3- जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाने भारतात निर्मिती होणाऱ्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या करोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली.
या लसीच्या उत्पादनानंतर 12 महिन्यापर्यंत वापरण्यास मान्यता देण्याचा निर्णय केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संघटनेने घेतल्यानंतर काहीच वेळात हा निर्णय जाहीर करण्यात आला. ही मुदतवाढ अतिरिक्त स्टॅबिलिटी डाटा पुरवल्दयानंतर देण्यात आली असल्याचे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे.
कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाल्यामुळे भारतात ही लस घेतलेल्यांना अन्य देशांत गेल्यानंतर विलगीकरण अथवा निर्बंधांना सामोरे जावे लागणार नाही. या निर्णयामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि साथीमुळे दुभंगलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही लस घेतलेल्या नागरिकांकडून या निर्णयाची चातकासारखी प्रतिक्षा केली जात होती.
ही लस भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. भारतात कोव्हॅक्सिनचे डोस देण्यास याआधीच सुरूवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याआधीच या लसीला मान्यता दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हॅक्सिनचा वापर होण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता आवश्यक होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून या मान्यतेची प्रतीक्षा सगळ्यांना लागली होती.
गेल्याच आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेककडून लसीविषयी अतिरिक्त माहिती मागवली होती. ही माहिती तपासून पाहिल्यानंतर डब्ल्यूएचओचे समाधान झाले आणि लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वी कोवॅक्सिन लसीला मंजुरी देण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार मंडळाची बैठक पार पडली. जगभरातील तज्ज्ञांचा या मंडळात समावेश आहे.
या मंडळाकडून कोवॅक्सिन लस करोनाविरोधात प्रवाभी असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही लस जागतिक स्तरावर आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिली जाण्यास सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.