मुंबई – दिवाळी सणानिमित्त उद्यापासून म्हणजे गुरुवार, दि. 4 नोव्हेंबर ते रविवार, दि. 7 नोव्हेंबर 2021 असे चार दिवस मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर कोविड लसीकरण बंद राहणार आहे. यानंतर सोमवार, दि. 8 नोव्हेंबरपासून लसीकरण पूर्ववत सुरु होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही करोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. यात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे चित्र असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी अद्याप संपूर्ण लसीकरण झालेले नाही.
10 हजार सोसायट्या “लसवंत’
मुंबईकरांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर “फुल्ली वॅक्सिनेटेड’ म्हणजे, पूर्णपणे करोनाची लस घेतलेली इमारत, असा फलक लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मुंबईतील 10 हजार सोसायट्या लसवंत झाल्या असून 10 हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.