बीजिंग – विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताकडून आज सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी व अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले.
बीजिंग येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू आणि सौरभ यांनी चांगला फॉर्म कायम राखला आहे. यापूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतही या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. मनू आणि सौरभ यांनी यजमान चीनच्या खेळाडूंच्या जोडीला अंतिम फेरीत 16-6 असे पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मनू आणि सौरभ यांनी पात्रता फेरीमध्ये 482 गुण पटकावले होते. त्यामुळे मनू आणि सौरभ यांना पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मनूने मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले असले तरी तिला महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा अडथळाही तिला पार करता आला नव्हता. पण मिश्र दुहेरी प्रकारामध्ये मात्र मनूने सौरभबरोबर खेळताना ही कसर भरून काढली.
यापूर्वी भारताच्या अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले होते. भारताचे या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक होते. अंजुम आणि दिव्यांश या जोडीने चीनच्या लिऊ रुक्सुअन आणि यांग हाओरन यांच्यावर अटीतटीच्या लढतीत 17-15 असा विजय मिळवला.