युजीन – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताचा गोल्डनबॉय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने येथे सुरू असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत विक्रमी कामगिरी केली.
अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत नीरजचा समावेश अ गटात होता. तसेच या स्पर्धेला प्रारंभ झाल्यावर पहिला क्रमांक त्याचाच होता. अंतिम फेरी आता येत्या रविवारी होणार असून नीरजचे पदक जवळपास निश्चित मानले जात आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी 83.50 मीटर अंतर पार करण्याची गरज असते. अ गटात सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंची कामगिरी पाहता नीरजचीच कामगिरी सर्वोत्तम ठरली. याच गटातून टोकियो ऑलिम्पिकमधील रजतपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच यानेही अंतिम फेरी गाठली असून आता सुवर्णपदकासाठी त्याची नीरजशी स्पर्धा रंगणार आहे.
ऑलिम्पिकपासून जबरदस्त भरात
नीरजने नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत मानाच्या डायमंड लीग मैदानी स्पर्धेत रजतपदक जिंकत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्या स्पर्धेत नीरजने 89.94 मीटर अंतर नोंदवले होते. तसेच 2018 साली झ्युरिचला झालेल्या डायमंड लीगमध्येच पुढील फेरीत नीरजने चौथे स्थान मिळवले होते. त्या स्पर्धेत त्याने 85.73 मीटर अंतरावर भालाफेक केली होती.
फिनलंड येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेतही चमकदार कामगिरी करताना नीरजने राष्ट्रीय विक्रम साकार केला होता. त्यावेळी त्याने 89.30 मीटर भालाफेक करत रजतपदकावर नाव कोरले होते. त्यानंतर झालेल्या क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत अत्यंत प्रतिकूल वातावरणातही नीरजने 86.30 मीटर अंतर पार केले होते.