मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असूनही अमेरिकेतील व्याजदरवाढीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत होते. मात्र आता या गुंतवणूकदारांनी भारतात खरेदी करण्याचे ठरविले असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसापासून हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारामध्ये बरीच खरेदी आहेत. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वाढत आहेत.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 390 अंकांनी वाढून 56,072 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 114 अंकांनी वाढून 16,719 अंकावर बंद झाला. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 1,799 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. सोमवारपासून हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांना बराच दिलासा मिळत आहे. त्यामुळे निर्देशांक सलग सहाव्या दिवशी वाढण्यास मदत झाली.
बॅंकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची आज जास्त खरेदी झाली. अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, टायटन, कोटक महिंद्रा बॅंक, हिंदुस्तान युनियन लिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.
मात्र इन्फोसिस, एनटीपीसी, पावर ग्रीड, विप्रो, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. युरोप, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान इत्यादी देशातून सकारात्मक संदेश आल्यामुळे शेअर बाजारात खरेदी होत असल्याचे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. त्याचबरोबर आता निर्देशांक कमी होणार नाहीत असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे खरेदी वाढली आहे. भारतातील कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत आहेत. याचाही सकारात्मक परिणाम होत आहेत.