तुळापूर येथील घटना
वाघोली- दारू पिण्याच्या वादातून झालेल्या दोन कामगारांच्या भांडणामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाली. ही घटना तुळापुर येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराजवळील कामगारांसाठी बांधलेल्या पत्र्याच्या शेडजवळ घडली. याप्रकणी लोणीकंद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दुसऱ्या कामगाराला अटक केली आहे. सुरेश (पूर्ण नाव माहित नाही), असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्याची पूर्ण ओळख पटलेली नाही. मारहाण करून खून केल्याप्रकरणी धर्मराज भानुदास तळी (मारवडी, अकोला) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळापूर येथील कंत्राटदार राजू मेडकर यांनी कामगारांसाठी यल्लम्मा देवीच्या मंदिराजवळ पत्र्याचे शेड बांधले आहे. येथून जवळच मोकळ्या जागेमध्ये कामगार सुरेश व धर्मा तळी यांच्यामध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. धर्मा याने लाकडी दांडक्याने सुरेश याला मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी धर्मा तळी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून लोणीकंद पोलिसांनी त्यास अटक केली. त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.