खासदार सुळेंचे रुग्ण कल्याण समितीला अश्वासन
भोर-येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक आरोग्य विषयक सोयी सुविधांचा अभाव आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांना रुग्ण सेवा पुरवण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रुग्णालयाला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी शासन स्तरावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यांशी बैठक घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे अश्वासन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
शनिवारी (दि. 11) रुग्णालयातील सभागृहाचे भूमिपुजन खा. सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. दत्तात्रय बामणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. महेंद्र गवळी, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. जयश्री मनुर, डॉ. आनंद साबणे यांचे सह रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष विशाल तनपुरे, सदस्य सारंग शेटे, भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, उपसभापती दमयंती जाधव, भोर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, सदस्य लहूनाना शेलार, विठ्ठल शिंदे, यशवंत डाळ, नितीन धारणे, चेतन चव्हाण, मनोज खोपडे, स्वप्निल कोंडे, रविंद्र बांदल, आदिंसह रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर खासदार सुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्नांवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे अश्वासन दिले.