अनिल राठोड : संबंधित अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नगर – बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे 4 महिन्यांपूर्वी करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता उखडला आहे. त्यामुळे शासनाच्या पैशांची लुट करणाऱ्या ठेकेदारावर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले आहे. असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अशोक बडे, निलेश भाकरे, दत्ता सप्रे, आकाश कातोरे, मदन आढाव, संजय शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी राठोड म्हणाले, उपनगरातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे काम चार महिन्यापूर्वी ठेकेदारामार्फत झाले होते, त्यावेळी हे काम अत्यंत नित्कृष्ट स्वरुपाचे साहित्य वापरल्यामुळे व हा रस्ता लगेचच खराब झाला असल्याने शिवसेनेने मोठ आंदोलन केले होते व त्या आंदोलनात आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हे आंदोलन झाल्यानंतर संबंधित ठेकेदार याने तात्पुरती जुजबी दुरुस्ती करुन मलम पट्टी केली.
परंतु आता अवघ्या चार महिन्यातच हा रस्ता पूर्णपणे उखडला गेला असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावरील टाकलेले गज पूर्णपणे उघडे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ठेकेदारांकडून आता त्यावर पांघरुण घालण्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली फक्त सिमेंटचे पाणी ओतून उघडे पडलेले खड्डे व गज बुजविण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून शासनाच्या पैशांची लुट करण्यात आलेली आहे.
तरी या कामाची निष्पक्षपणे चौकशी करुन महापालिकेचे संबंधित अधिकारी या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार आणि त्यास साथ देणाऱ्यांची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करावी आणि संबंधित अधिकारी, ठेकेदार याच्यावर झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी त्वरित गुन्हे दाखल करुन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. अन्यथा शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही अनिल राठोड यांनी यावेळी दिला.