2020 अखेर पालटणार रूप : “एलएचबी कोच’चाही विचार
– कल्याणी फडके
पुणे – मागील 90 वर्षांपासून पुणे-मुंबई-पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची “लाइफलाइन’ “डेक्कन क्वीन’चे रूप 2020 च्या अखेरपर्यंत पालटणार आहे. यासाठी अहमदबाद येथील “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ची निवड करण्यात आली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून डेक्कन क्वीनची डायनिंग कार बंद करण्यात येणार असल्याची चर्चा होती. याबाबत प्रवासी संघटनांनी रेल्वेला पत्र देखील दिले होते. पण, या निर्णयामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
“डेक्कन क्वीन’चे प्रमुख आकर्षण असणाऱ्या “डायनिंग कार’मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना येत्या काळात नव्या रूपातील आकर्षक “इंटेरिअर’ने युक्त डायनिंग कारचा अनुभव घेता येणार आहे. यासह गाडीच्या कोचचे रूपांतर एलएचबी (लिंक हॉफमन बुश) कोचमध्ये करण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे. याबाबत पाच आराखडे रेल्वे बोर्डाकडे अंतिम निर्णयासाठी पाठवले होते. यानंतर “एनआयडी’शी समन्वय साधण्यात आला आहे. संस्थेच्या पथकाने मुंबई येथे भेट देत, “डेक्कन क्वीन’च्या प्रवाशांशी संवाद साधला आहे. संस्थेकडून अंतिम आराखडा पाठवण्यात येणार आहे.
असा आहे प्रस्ताव
मध्य रेल्वेने “डेक्कन क्वीन’च्या प्रवाशांशी संवाद साधून, पाच नवीन रंगसंगतीची निवड केली होती. त्यापैकी “रॉयल ब्लू’ रंगाची निवड करण्यात येणार आहे. वरच्या आणि खालच्या बाजूला लाल पट्टा असून, यावर “डीक्यू’ ही अक्षरे असणार आहेत. या गाडीचा नवीन लोगोदेखील होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (सीएसएमटी) प्रतिमा आहे.
प्रतिष्ठेची रेल्वे गाडी म्हणून डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. याबाबत आम्ही विविध संस्थांशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून आराखडे मिळाले होते. त्यापैकी अहमदबादच्या “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’च्या “डिझाइन’ची निवड केली आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.