पुणे – धीरज जाधव क्रिकेट अकादमी आयोजित महिला प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत हेमंत पाटील रॉयल क्रिकेट अकादमीने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. एचपी रॉयलने आझम क्रिकेट अकादमीला सात गडी राखून सलग दोनदा हरविले. एचपी रॉयलची कर्णधार पूनम खेमनार हिने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. आझमचे 115 धावांचे माफक आव्हान त्यांनी 17 व्या षटकातच पार केले.
सलामीची फलंदाज मुक्ता मगरे हिने 66 धावांची खेळी करीत पाठलाग एकतर्फी ठरविला. सलामीला बढती मिळालेल्या सोनल पाटीलने 26 धावा केल्या. तिच्या साथीत मुक्ताने 96 धावांची सलामी दिली. आरती केदारने मुा आणि माधुरी आघाव (2) यांना 15 व्या षटकात सलग दोन चेंडूंवर बाद केले. तिची हॅट्ट्टिक मात्र हुकली.
मग तेजलने तीन चौकारांसह विजयाची औपचारकता धडाक्यात पूर्ण केली. त्याआधी आझमकडून कर्णधार किरण नवगिरे (31) हिचा अपवाद वगळता इतर प्रमुख फलंदाज स्थिरावल्या नाहीत. यष्टिरक्षिका अंबिका वाटाडे हिने 27 धावांची भर घातली. त्यामुळे आझमला शतकी पल्ला पार करता आला. आझमच्या चार फलंदाज धावचीत झाल्याने डावाला आकार मिळू शकला नाही.
दुसऱ्या सामन्यात वाव क्रिकेट अकादमीने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एचव्हीपीएम) संघाला 59 धावांनी हरविले. वावच्या 121 धावांच्या आव्हानासमोर एचव्हीपीएमचा डाव 61 धावांत संपुष्टात आला. जाई शिंदे हिने अष्टपैलू कामगिरी केली. तिने 29 धावा केल्या, तसेच नऊ धावांत दोन विकेट घेतल्या.