सावेडीतील कचरा डेपोला पुन्हा आग

नगर – सावेडीतील कचरा डेपोला मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 7.30 च्या सुमारास पुन्हा आग लागली. अनेक दिवसांपासून कचरा डेपो बंद असल्याने डेपोत साचलेला कचरा वाळलेला होता. त्यामुळे काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी रात्री एक वाजेपर्यंत प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले होते.

महानगरपालिकेच्या सावेडी कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी देखील या डेपोला आग लागली होती. त्यावेळी शहराचा संपूर्ण कचरा या डेपोत प्रक्रियेसाठी नेला जात होता. मात्र, या आगीच्या घटनेनंतर तेथे कचरा टाकणे बंद असून, आता बुरुडगावच्या कचरा डेपोत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आल्याने सावेडीऐवजी बुरुडगावच्या डेपोत कचरा पाठवला जातो. सावेडी डेपो सध्या बंद असला, तरी यापूर्वीच्या कचर्‍याचे येथे ढीग आहेत.

मंगळवारी सायंकाळी अचानक या डेपोला आग लागल्याने महापालिकेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग मोठी असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. अग्निशामक विभागप्रमुख शंकर मिसाळ यांनी तातडीने दोन अग्निशामक वाहने सावेडीकडे रवाना केली. डेपो परिसरात धुराचे लोळ पसरल्याने जवानांची आग नियंत्रणात आणण्यासाठी उशिरापर्यंत कसरत सुरूच होती. आग अधिक पसरू नये, यासाठी एक पोकलेन मशिनच्या माध्यमातून कचरा बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. मध्यरात्री 1 च्या सुमारास ही आग आटोक्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.