प्रशिक्षण : कुलस्वामिनी महिला मंचच्या संस्थापक सारिका शेळके यांची माहिती
तळेगाव दाभाडे – फॅशन डिझायनिंग, ब्लाऊज व शिवण क्लासच्या मोफत प्रशिक्षणातून मावळ तालुक्यातील 15 हजार महिलांना रोजगार मिळाला. माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने वतीने कुलस्वामिनी महिला मंचतर्फ तालुक्यातील 40 ठिकाणी असे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहेत. या प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक सबल व सक्षम करण्याचे कार्य सुरू केले आहे.
या प्रशिक्षणामुळे हजारो महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे, अशी माहिती कुलस्वामिनी महिला मंचच्या (मावळ) संस्थापक सारिका शेळके यांनी दिली. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, आंबी, नवलाख उंब्रे, बधलवाडी, जांभवडे, इंदोरी, सुदुंबरे, वडगाव, सांगवी, देहू, देहूरोड, चिंचवली, कामशेत, खामशेत, पाटण, कुसगाव, करुंज, पुसाणे, आढले बुद्रुक, चांदखेड, बेबड ओहोळ, धामणे, खंडाळा, तुंगार्ली, भांगरवाडी, ओळकाईवाडी, माळवाडी, वलवण, कोंडीवडे (नाणे मावळ) आदी परिसरातील गरीब, गरजू महिलांच्या व्यथा कुलस्वामिनी महिला मंचने जाणून घेतल्या. त्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी उद्देशाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या पुढाकार घेतला. कुलस्वामिनी महिला मंचच्या (मावळ) माध्यमातून मोफत फॅशन डिझायनिंग, पंजाबी ड्रेस, ब्लाऊज व शिवण क्लास प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
या महिलांसाठी प्रत्येक दिवशी दोन तासांच्या प्रशिक्षणात नवनवीन फॅशनचे ब्लाऊज व ड्रेसची शिकवणी घेतली जाते. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाला. “चूल आणि मूल’मध्ये अडकलेल्या महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. प्रशिक्षित महिला प्रशिक्षक साधे ब्लाऊज 250 ते फॅशनचे ब्लाऊज 500 रुपयांपर्यंत, तर साधे ड्रेस 250 ते फॅशनचे ड्रेस 450 रुपयांपर्यंत शिवत आहेत.
कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात बेताची परिस्थिती असलेल्या महिला व मुलींनी सहभाग घेतला आहे. या वेळी वृषाली टिळे, राणी घुले, सुनीता हिरे, धनश्री गराडे, वैशाली थोरात, करुणा सरोदे, कावेरी पाटील, अख्तर जहॉं शेख, निर्मला कदम, स्नेहलता माने, कल्पना भेगडे यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.
मावळ तालुक्यातील गरीब, अशिक्षित कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनाचा संघर्ष जवळून पाहिला. त्यांच्यासाठी काही तरी करण्याची प्रेरणा घेवून त्यांना मोफत फॅशनचे ब्लाऊज व ड्रेस शिवण्याचे प्रशिक्षण दिल्यास त्या महिला आर्थिक स्वयंपूर्ण होतील हा उद्देश आहे. शेकडो अत्याधुनिक शिलाई मशीन व तज्ज्ञ प्रशिक्षक घेवून सुरू केलेल्या कार्याला महिला प्रशिक्षकाची मदत झाली. तालुक्यात 40 ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारून महिलांना आर्थिक सबल व सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे. तसेच गरजू महिलांनी प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदणी करावी.
– सुनील शेळके, माजी उपनगराध्यक्ष.