देहुरोड – राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत देहूगाव व किवळे परिसरात भात पिकाच्या उत्पादन तंत्रज्ञानाबाबत शेतीशाळा भरविण्यात आली. शेतीशाळेत कृषी विभागाच्या हवेली तालुका व उपविभागीय कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या आत्मा योजनेअंतर्गत भात प्रात्यक्षिक देहूगाव येथे गादी वाफ्यावरील भात रोपवाटिकेची पाहणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी खैरनार, तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, मंडळ कृषी अधिकारी हनुमंत खाडे, कृषी पर्यवेक्षक पावडे, कृषी सहायक मनीषा शिरसाठ, शेतकरी अंकुश हगवणे, वसंत हगवणे, मधुकर हगवणे, पूनम बोत्रे, महेश बोत्रे आदी उपस्थित होते.
कृषी विभागामार्फत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील किवळे येथे भात पीक शेतीशाळेत चिखलणी करताना गिरीपुष्पच्या पानाचा वापर, खतांचा योग्य वापर तसेच दोरीत लागवड कशी करावी, दोरी कशी तयार करावी आदीबाबत मार्गदर्शन केले आहे, असे कृषी सहाय्यक अधिकारी मनीषा शिरसाठ यांनी सांगितले.