IPL 2024 (KKR Vs RR Match 31) Shreyas Iyer Fined : कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरला दुहेरी धक्का बसला आहे. प्रथम, मंगळवारी त्याच्या संघानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध जिंकलेला सामना गमावला आणि त्यानंतर त्याला मोठा दंड ठोठावण्यात आला. राजस्थानविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की,”किमान ओव्हर रेटशी संबंधित आयपीएल आचारसंहितेअंतर्गत त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिला गुन्हा होता, त्यामुळे कर्णधार अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.” या सामन्यात कोलकाता संघाकडून निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात न आल्याने श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये अशी कारवाई होणारा श्रेयस पहिलाच कर्णधार नाही, यापूर्वी शुभमन गिल (एक वेळेस), ऋषभ पंत(दोन वेळेस) या कर्णधारांवरही ही कारवाई झाली आहे.
या सामन्यात सुनील नरेनच्या झंझावाती शतकामुळे केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, राजस्थानने एकवेळ 121 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या, परंतु जोस बटलरने एकट्याने लढा देत 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला गमावलेला सामना जिंकून दिला.
गुणतालिकेत कोणताही बदल नाही….
या सामन्यापूर्वी पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या तर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर होते. मात्र, सामना संपल्यानंतरही गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही. सहा सामन्यांत चार विजयांसह केकेआर आता दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान सात सामन्यांत सहा विजयांसह पहिल्या स्थानावर आहे.
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
Slow over rate rule in IPL
आयपीएलच्या नियमानुसार षटकांची गती कमी राखल्याची चूक संघाकडून पहिल्यांदा झाल्यास कर्णधारावर 12 लाखांचा तर दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर 24 लाखांचा आणि संघातील इतर खेळाडूंवरही 6 लाख किंवा सामना शुल्कातील 25 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.
त्याचबरोबर तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखांच्या दंडाबरोबरच एका सामन्याची बंदीही घातली जाते. तसेच संघातील इतर खेळाडूंवरही 12 लाख किंवा सामना शुल्कातील 50 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.