बारामती – जागतिक महिला दिन व येथील बारामती सायकल क्लब यांच्या महिला विभागाचा प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधत सायकल रॅली आयोजित करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात सकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व इतर मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. मोठ्या संख्येने महिला सदस्यांनी रॅलीत सहभाग नोंदवला.
संपूर्ण शहरातून ही रॅली निघाली. गुल पुनावाला गार्डन येथे रॅलीची सांगता करण्यात आली. बारामती “सायकल क्लब’च्या सायकलिंग क्षेत्रात विशेष उपक्रम केलेल्या महिला सभासदांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सोनाली ठवरे यांनी काश्मीर-कन्याकुमारी सायकल प्रवासाचे अनुभव कथन केले, तर ऍड. स्नेहा भापकर, आरती एकाड-पाटील यांनी व इतरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना हंगे यांनी केले.
रॅलीमध्ये बारामती सायकल क्लबतसेच न्यू बारामती सायकल क्लब, भिगवण सायकल क्लब, डोर्लेवाडी सायकल क्लब, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि इतर महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित राहिले होते. साधारण 200 महिला आणि पुरुष विभागाच्या 125 सदस्यांनी म्हणजेच 325 लोकांनी सहभागी होऊन ही सायकल रॅली यशस्वी केली. या सायकल रॅलीचे आयोजन बारामती सायकल क्लब आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावतीने करण्यात आले होते.