तज्ज्ञ अभियंते असूनही सल्लागारांवर वारेमाप खर्च
पिंपरी – महापालिकेत विविध विकास कामांसाठी वास्तू विशारदांची नेमणूक करण्यात येणार आहे. इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा कामाच्या प्रकारानुसार 50 लाखांपासून 10 कोटींच्या पुढील खर्चाच्या कामांसाठी वास्तू विशारदांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका पॅनेलवर असलेल्या वास्तू विशारद व सल्लागार यांच्याकडून दरपत्रक मागविण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या दरपत्रकानुसार ज्यांनी लघुत्तम दर सादर केले आहे. त्यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्याला मान्यता देण्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यावधी रूपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या इमारतींच्या संकल्पनांसाठी, बांधकामांसाठी आणि बांधकाम परवानगी घेण्यासाठी पुरेसे तांत्रिक नैपुण्य महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात आहे. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग, गुंतागुंतीचे तांत्रिक प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानाची गरज, पर्यावरण विषयक, संशोधनात्मक अभ्यास, खासगीकरणातून करायच्या प्रकल्पांसाठी कायदेविषयक, अर्थविषयक अशा बाबींसाठी वास्तू विशारद अथवा त्या क्षेत्रातील तज्ञ नेमण्याची आवश्यकता असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे.
गेल्या काही वर्षात महापालिकेत रस्ते, उड्डाण पूल बांधण्यापासून भाजी मंडईच्या विस्तारापर्यंत सर्वच छोट्या-मोठ्या कामांसाठी वास्तुविशारद नेमण्याचे पेव फुटले आहे. महापालिकेत वास्तुविशारद आणि सल्लागारांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. या वास्तुविशारदांवर प्रकल्प रकमेच्या दोन ते अडीच टक्के रूपयांची उधळपट्टी केली जाते. महापालिकेत तज्ज्ञ अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घालण्यात आला आहे.
महापालिकेच्या वास्तुविशारद पॅनेल वरील या क्षेत्रातील तज्ज्ञ वास्तुविशारद यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार वास्तुविशारद व प्रकल्प सल्लागार यांची नियुक्ती करण्याकरिता आवश्यक असलेली दरपत्रके 2 जानेवारी 2020 रोजी मागविण्यात आली होती. त्यानुसार सल्लागार व वास्तुविशारद यांची दरपत्रके सादर झाली आहेत. त्यांना मान्यता देण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.