#महिला_दिन_विशेष : सातारच्या राजकारणातील लोकप्रिय, अभ्यासू, आक्रमक व्यक्तिमत्व : सिद्धी पवार

सातारच्या राजकारणातील सुपरिचित, लोकप्रिय, अभ्यासू आणि आक्रमक व्यक्‍तिमत्व म्हणून भाजपच्या नगरसेविका सौ. सिद्धी रवींद्र पवार यांची ओळख आहे. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा….

ज्यांना साताऱ्यातील क्रियाशील, कार्यक्षम महिला माहिती आहेत, त्यांना सिद्धी पवार हे नाव नवे नाही. सर्वसामान्य नागरिक व महिलांसाठी सतत कार्यमग्न राहण्यामुळे व अभ्यासू, आक्रमक वृत्तीमुळे सिद्धीताईंनी विश्‍वासार्हता मिळविली आहे. विधानसभेतील भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीने खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांची सातारा पालिकेच्या बांधकाम समिती सभापतिपदी नियुक्‍ती केली आहे.

 

बऱ्याचदा राजकारणात असलेल्या बऱ्याचशा महिला नावापुरत्या असतात. त्यांचे पतीराजच कारभार पहात असतात; पण याला सिद्धी पवार यांचे पती रवींद्र पवार हे अपवाद आहेत. ते सिद्धीताईंच्या कामात, राजकारणात अजिबात हस्तक्षेप करत नाहीत. त्यांना स्वतंत्रपणे काम करू देतात. अल्प कालावधीत राजकारण व समाजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या सिद्धीताई या चांगल्या गृहिणी, लेखिका व चित्रकारही आहेत. स्वतःच्या प्रभागात कामे करताना, शहराच्या विकासासाठी आक्रमक होत सत्ताधाऱ्यांकडून काम करवून घेतानाच त्यांनी स्वतःमधील कलाकार जपला आहे.

कोविड काळात जिजाऊ प्रतिष्ठान व शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने धान्यवाटप, रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविणाऱ्या औषधांचे वाटप केल्याने राज्य शासनातर्फे त्यांना करोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे. प्रभागातील विकासकामांसाठी त्यांनी तीन-साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. वयोवृद्धांकरिता प्रभागात अटल विरंगुळा केंद्र उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

अटल स्मृती उद्यान, कलाकारांसाठी आर्ट गॅलरी लवकरच उभी राहणार आहे. बांधकाम सभापती झाल्यापासून त्यांनी शहरातील विकासकामांना गती दिली येत आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही बाजू त्या मांडतात. त्यामुळे सिद्धीताईंचा दबदबा निर्माण झाला आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी त्यांनी ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सिद्धीताई जितक्‍या कार्यतत्पर आहेत, तितक्‍याच प्रेमळ, कलाप्रेमी आहेत. असे पैलू असलेले हे व्यक्तिमत्व महिला सबलीकरण व शहराच्या विकासासाठी लोकांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण करत आहे.

जिजाऊ प्रतिष्ठान, जिजाऊ महिला सहकारी संस्था, सिद्ध आर्ट हस्तकला दालन या त्यांनी उभ्या केलेल्या प्रकल्पांमुळे महिला सबलीकरण होत असल्याची प्रचिती येते. “जिथे कमी, तिथे आम्ही’ हे त्यांचे वाक्‍य सातारकरांबद्दलची आत्मीयता दाखवते. “डाऊन टू अर्थ’ असलेल्या या “सुपरवूमन’ नेतृत्वाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

प्रा. सौ. सारिका निकम,
उपाध्यक्ष, जिजाऊ महिला सहकारी संस्था, सातारा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.