पिंपरी-चिंचवड महापालिका झोपडपट्‌टीत उभारणार सोलर पॅनल

प्रायोगिक तत्त्वावर करणार उभारणी : पालिकेचा पुढाकार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील शांतीनगर, विठ्ठलनगर आणि दत्तनगर या तीन झोपडपट्ट्यांमधील घरांना सोलर पॅनेलद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना थेट पद्धतीने कंत्राट देण्यात येणार आहे.

झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरामध्ये सोलर पॅनेलद्वारे वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलर होम लाइटद्वारे पर्यावरणदृष्ट्या वीज प्रवाह होणार असल्याने विजेचा वापर कमी होईल. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर शांतीनगर, विठ्ठलनगर आणि दत्तनगर या झोपडपट्ट्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात घराच्या छतावर सोलर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे.

निर्माण झालेली वीज थेट महावितरणच्या यंत्रणेद्वारे जोडली जाऊ शकते. यामुळे विजेचे मासिक बिल कमी प्रमाणात येणार आहे. यासाठीची खरेदी महापालिकेच्या शहर सुधारणा विभागामार्फत झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन स्थापत्य विभागाकडून करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शहर सुधारणा विभागातील अखर्चित रक्कम या शीर्षकावर वेळोवेळी निधी उपलब्ध केला जाणार आहे.

महापालिका शहर सुधारणा समितीच्या 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला होता. स्थायी समितीच्या सभेमध्ये याला आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.